Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी कौटुंबिक वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला

कौटुंबिक वादातून सख्ख्या भावावर कोयत्याने हल्ला

खेड तालुक्यातील मिर्ले मानेवाडी येथील घटना

खेड:- तालुक्यातील मिर्ले मानेवाडी येथे दारूच्या नशेत असलेल्या एका इसमाने आपल्या सख्ख्या भावावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादी संतोष भागोजी माने (५०) हे जखमी झाले असून, खेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, १ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आरोपी तुकाराम भागोजी माने हा दारू पिऊन घरी आला होता. तो आपला तिसरा लहान भाऊ बबन माने यांचा मुलगा मंगेश याला विनाकारण मारहाण करत होता. ही मारहाण थांबवण्यासाठी आणि विचारणा करण्यासाठी फिर्यादी संतोष माने तिथे गेले असता, आरोपीचा राग अनावर झाला.

​भावाने विचारणा केल्याचा राग मनात धरून आरोपी तुकाराम याने आपल्या हातातील कोयत्याने संतोष माने यांच्या डोक्याच्या डाव्या बाजूला प्रहार केला. या हल्ल्यात संतोष माने यांना गंभीर दुखापत झाली आहे. केवळ मारहाण करूनच आरोपी थांबला नाही, तर त्याने घटनास्थळी शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.

​या प्रकरणी संतोष भागोजी माने यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी २ मे रोजी मध्यरात्री १२:२४ वाजता भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५, ३५२, ३५१(२)(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, सख्ख्या भावांनी एकमेकांवर शस्त्र उचलल्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.