वृद्धाची गडनदीत उडी घेऊन आत्महत्या

धामापूर येथील घटना

संगमेश्वर:- तालुक्यातील धामापूर तर्फे संगमेश्वर येथील एका ७५ वर्षीय वृद्धाने एकाकीपणाला कंटाळून गडनदीच्या पात्रात उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रामचंद्र रावजी महाडीक असे मृत वृद्धाचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र रावजी महाडीक (वय ७५, रा. धामापूर तर्फे संगमेश्वर) हे गेल्या काही काळापासून एकाकीपणा जाणवत असल्याने मानसिक तणावाखाली होते. याच नैराश्यातून ते दि. २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले होते.
​कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता, दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास निमरीपार येथील गडनदीच्या पाण्याच्या पात्रात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. एकाकीपणाला कंटाळून त्यांनी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

​या घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.