जुन्या वैमनस्यातून वेल्डरला बांबूने मारहाण

वालोपे येथील घटना, एकावर गुन्हा दाखल

चिपळूण:- जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाला आणि त्याला वाचवण्यासाठी आलेल्या महिलेला बांबूच्या काठीने बेदम मारहाण केल्याची घटना चिपळूणमधील वालोपे भोजवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आरोपी केतन प्रकाश भोसले याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद महादेव जाधव (वय ३१, रा. मतेवाडी) हे वेल्डरचा व्यवसाय करतात. शनिवारी रात्री १० च्या सुमारास प्रमोद हे त्यांची ओळखीची महिला साक्षीदार स्वरा मोहिते हिच्या घरी चायनीजचे पार्सल देण्यासाठी वालोपे येथे गेले होते. स्वरा मोहिते आणि आरोपी केतन भोसले यांच्यात जुन्या कारणावरून वाद असून त्यांच्यावर यापूर्वी गुन्हा देखील दाखल आहे.

प्रमोद जाधव हे स्वरा मोहिते यांना नेहमी मदत करतात, याच गोष्टीचा राग आरोपी केतन भोसले याच्या मनात होता. प्रमोद हे स्वरा यांच्या घराच्या अंगणात उभे असताना आरोपीने पाठीमागून येऊन सोबत आणलेल्या बांबूच्या काठीने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात प्रमोद यांच्या मानेच्या डाव्या बाजूला, उजव्या खांद्यावर आणि डाव्या पायाच्या मांडीवर गंभीर दुखापत झाली आहे.

हा प्रकार सुरू असताना स्वरा मोहिते या प्रमोद यांना सोडवण्यासाठी धावल्या असता, आरोपीने त्यांनाही बांबूने मारहाण केली. यामध्ये त्यांच्या कंबरेला दुखापत झाली आहे. याप्रकरणी प्रमोद जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी आरोपी केतन प्रकाश भोसले (रा. वालोपे) याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८ (१) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.