सोवेली चव्हाणवाडी येथील घटना
दापोली:- दापोली तालुक्यातील सोवेली चव्हाणवाडी येथील ७० वर्षीय वृद्धेचा विसापूर नळपाणी योजनेच्या विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ९ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी सहदेव भानत (वय ७०, रा. सोवेली चव्हाणवाडी) या गेल्या काही काळापासून सांधेदुखीच्या आजाराने त्रस्त होत्या. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना डोकेदुखीचाही त्रास होत होता आणि त्या सतत डोके धरून बसलेल्या असायच्या. गुरुवारी ९ एप्रिल रोजी दुपारी १२:०० वाजेच्या सुमारास त्या घरातून अचानक बेपत्ता झाल्या.
त्यांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला असता, घराच्या जवळच असलेल्या विसापूर नळपाणी योजनेच्या विहिरीच्या पाण्यात त्या उताण्या अवस्थेत तरंगताना मिळून आल्या. त्यांना तातडीने विहिरीतून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
आजाराला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल?
लक्ष्मी भानत या वयोवृद्ध होत्या आणि आजारपणामुळे शारीरिक व मानसिक त्रासात होत्या. याच त्रासाला कंटाळून त्यांनी विहिरीत उडी घेतली असावी किंवा पाय घसरून त्या विहिरीत पडल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी मयत लक्ष्मी यांचे पुतणे रविकांत गोविंद भानत यांनी दापोली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिसांनी या घटनेची बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे (अमृ. क्र. ३८/२०२६). दापोली पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.









