चिपळूण:- चिपळूण येथील काविळतळी परिसरातून एका २९ वर्षीय तरुणाचे चारचाकी गाडीतून अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून हा प्रकार घडला असून, आरोपींनी तरुणाला त्याच्या वडिलांसमोरच गाडीत बसवून पळवून नेले.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम प्रकाश पवार (वय २९) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवार, ८ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास काविळतळी येथील ‘राहुल गार्डन’ समोर ही घटना घडली. शुभमचे वडील प्रकाश मार्तंडराव पवार (वय ७०) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे.
शुभम आणि आरोपी सौरभ चव्हाण व वैभव साकुंडे यांच्यात आधीपासून पैशांचे व्यवहार झाले होते. बुधवारी सायंकाळी आरोपींनी शुभमला फोन केला आणि त्याला बिल्डींगखाली भेटायला बोलावले. शुभम खाली जात असताना त्याचे वडील प्रकाश पवार हेदेखील त्याच्या सोबत आले होते. मात्र, शुभम बिल्डींगखाली पोहोचताच आरोपींनी त्याला जबरदस्तीने आपल्या फोर व्हीलर गाडीत बसवले आणि तिथून वेगाने निघून गेले.
या प्रकरणी सौरभ चव्हाण (रा. काळज, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा), वैभव साकुंडे (रा. काळज, लोणंद, ता. फलटण, जि. सातारा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४०(३) आणि ३(५) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी रात्री ११:४१ वाजता या घटनेची अधिकृत नोंद करण्यात आली. पोलीस सध्या आरोपींचा आणि अपहृत शुभमचा शोध घेत असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.









