Monday, May 25, 2026
spot_img
Home गुन्हेगारी व्हिडीओ शूटिंगच्या संशयावरून एकाला मारहाण करत सायलेन्सरने दिले चटके

व्हिडीओ शूटिंगच्या संशयावरून एकाला मारहाण करत सायलेन्सरने दिले चटके

मंडणगड शिपोळे बंदर येथील घटना

मंडणगड:- गाडीचे व्हिडीओ शूटिंग केल्याच्या संशयावरून चुलत भावाने आणि त्याच्या कुटुंबीयांनी एका ४७ वर्षीय चालकाला बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना मंडणगड तालुक्यातील शिपोळे बंदर येथे घडली आहे. या मारहाणीत फिर्यादीला दुचाकीच्या गरम सायलेन्सरने चटके देऊन जखमी करण्यात आले असून, याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी जमान सईद लांबे (वय ४७, व्यवसाय- ड्रायव्हर) हे गुरुवारी २ एप्रिल रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. ते चुलत भाऊ रशीद शरीफ लांबे यांच्या घरासमोर पोहोचले असता, आरोपी नवाफ रशीद लांबे याने त्यांची गाडी अडवली. “तू माझ्या गाडीचे व्हिडीओ शूटिंग केले आहेस, तुझा मोबाईल दाखव,” असे म्हणत नवाफने वादाला सुरुवात केली.

जमान लांबे यांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने नवाफने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्याने आपले वडील रशीद आणि भाऊ सैफ यांना बोलावून घेतले. झटापटीत आरोपी रशीद लांबे याने फिर्यादीचा डावा पाय दुचाकीच्या गरम सायलेन्सरला टेकवला, ज्यामुळे त्यांच्या पोटरीला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच, फिर्यादीचा महागडा सॅमसंग मोबाईल हिसकावून तो रस्त्यावर आपटून फोडण्यात आला.

या मारहाणीत रशीद लांबे यांच्या जेसीबी ऑपरेटरनेही फिर्यादीला पाठीवर मारहाण केली. आरोपी रेश्मा लांबे यांनी फिर्यादीचा शर्ट ओढून शिवीगाळ केली. या सर्व राड्यामध्ये आणि ओढाताणीमध्ये फिर्यादीच्या खिशातील ११,३०० रुपये रोख आणि गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र कुठेतरी पडून गहाळ झाले आहे.

​मंडणगड पोलिसांनी याप्रकरणी रशीद शरीफ लांबे, सैफ रशीद लांबे, रेश्मा रशीद लांबे, नवाफ रशीद लांबे, रशीद लांबे यांचा जेसीबी ऑपरेटर या आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. ​या घटनेचा अधिक तपास मंडणगड पोलिस करत असून, जखमी जमान लांबे यांच्यावर उपचार सुरू आहेत.