वेरवली डाफळेवाडी येथील घटना
लांजा:- कौटुंबिक वादातून सुनेने आपल्या ७५ वर्षीय सासूवर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केल्याची खळबळजनक घटना लांजा तालुक्यातील वेरवली डाफळेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी लांजा पोलिसांनी संशयित आरोपी सुनेविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सत्यवती सखाराम पवार (वय ७५) आणि त्यांची सून स्वाती भिकाजी पवार या एकाच घरात विभक्त राहतात. शुक्रवारी ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आरोपी स्वाती पवार आणि तिचा पती यांच्यात घरात मोठ्याने भांडण सुरू होते.
हे भांडण सोडवण्यासाठी आणि त्यांना समजावण्यासाठी वृद्ध सासू सत्यवती पवार आणि त्यांचे नातेवाईक बाळकृष्ण यशवंत पवार तिथे गेले. मात्र, रागाच्या भरात असलेल्या सुनेने त्यांनाच शिवीगाळ करत कोयत्याने हल्ला केला.
या हल्ल्यात कोयत्याचे वार सत्यवती पवार यांच्या कपाळावर डाव्या बाजूला आणि उजव्या हाताच्या मनगटावर बसले. यामुळे त्या रक्ताबंबाळ होऊन जखमी झाल्या. ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेवर अशा प्रकारे हिंसक हल्ला झाल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
याप्रकरणी जखमी सत्यवती पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून लांजा पोलिसांनी संशयित आरोपी स्वाती भिकाजी पवार हिच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ६९/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(१) (धोकादायक शस्त्राने दुखापत करणे), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.









