दापोली-मंडणगड मार्गावरील घटना
दापोली:- दापोली ते मंडणगड या महामार्गावर आज मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात घडला असून, वीज वाहिनीला डंपरचा स्पर्श झाल्याने लागलेल्या जोरदार धक्क्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी ११ ते ११:३० च्या सुमारास दापोली-मंडणगड मार्गावरील भवानी मार्बल दुकानासमोर ही हृदयद्रावक घटना घडली. डंपर चालक अशफाक हुसेन आराइ (वय ६०) हे आपल्या डंपरमधून मातीची वाहतूक करत होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, माती रिकामी करण्याचे काम सुरू असताना डंपरचा मागील भाग महावितरणच्या मुख्य वीज वाहिनीला लागला. यामुळे संपूर्ण डंपरमध्ये हायव्होल्टेज विद्युत प्रवाह उतरला आणि चालकाला त्याचा भीषण झटका बसला. हा करंट इतका जोरात होता की, अशफाक यांचा जागीच मृत्यू झाला.
मृत चालक अशफाक हुसेन आराइ हे मूळचे ताडील गावचे असून सध्या ते आपल्या कुटुंबासह दापोली येथील खोडा परिसरात वास्तव्यास होते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. तातडीने त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ऐन कामाच्या वेळी घडलेल्या या भीषण अपघातामुळे दापोली परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून, महावितरणच्या वीज वाहिन्यांच्या सुरक्षिततेबाबतही आता स्थानिक नागरिकांमधून चर्चा सुरू झाली आहे. ६० वर्षीय अशफाक यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.









