दापोलीत पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना दापोलीतील जोगळे-नशेमन कॉलनी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून दापोली पोलिसांनी पतीसह पाच जणांविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी नजीफा मंजूर दळवी (वय २७, सध्या रा. चिपळूण) यांचा विवाह ९ नोव्हेंबर २०२४ रोजी मंजूर शकील दळवी यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळातच ९ नोव्हेंबर २०२४ ते ८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पती, सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांनी हुंड्यासाठी नजीफा यांचा छळ सुरू केला. त्यांना क्रूर वागणूक देऊन वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देण्यात आला.
तक्रारीनुसार, लग्नात नजीफा यांना मिळालेले १० तोळे सोन्याचे दागिने आणि १ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम आरोपींनी स्वतःच्या ताब्यात ठेवून त्याचा अपहार केला. इतकेच नव्हे तर, या छळाबाबत कोणाला सांगितल्यास किंवा पळून गेल्यास “जीवे ठार मारू” अशी धमकीही आरोपींनी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी पती मंजूर शकील दळवी याच्यासह ममताज शकील दळवी, शकील दिलावर दळवी, मेहनाज वाहिद महाडीक, कमरजहॉन शादाब मुजावर (सर्व रा. नशेमन कॉलनी, भारत नगर, जोगळे, ता. दापोली) या पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी दापोली पोलिसांनी ३० मार्च रोजी दुपारी ४ वाजता भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ८५, ३१६ (२), ३१८ (४), १११ (२), ३५१ (२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दापोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.









