गुहागर अंजनवेल सड्येवाडी येथील घटना
गुहागर:- रात्रीच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडलेल्या एका ६५ वर्षीय निवृत्त वृद्धाला अमानुष मारहाण करून सोन्याची चैन चोरून नेल्याची धक्कादायक घटना अंजनवेल सड्येवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
अंजनवेल सड्येवाडी येथील रहिवासी गणपत दाजी कदम (वय ६५) हे २५ मार्च रोजी रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडले होते. रात्री पावणे दहाच्या सुमारास त्याच वाडीत राहणारा आरोपी प्रतिक डांगे (वय २५) याने कदम यांना गाठले. “बाबू कडव यांच्या हॉटेलपर्यंत जाऊन परत येऊ,” असे म्हणत त्याने कदम यांना सोबत चालण्याचा आग्रह केला. रात्रीचे सव्वा दहा वाजल्याने कदम यांनी घरी परत जाण्याचे बोलूनही आरोपीने त्यांना आग्रह करून सोबत नेले. हॉटेलपासून परत येत असताना निर्जन ठिकाणी आरोपीने अचानक कदम यांचा गळा आवळला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन ओढली.
प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने जमिनीवरील दगड उचलून कदम यांच्या डोक्यात आणि डाव्या डोळ्यावर प्रहार केला. इतक्यावरच न थांबता, आरोपीने कदम यांचा टी-शर्ट पकडून त्यांना रस्त्यावरून फरपटत नेले आणि बाजूच्या झाडीत फेकून दिले. या झटापटीत आरोपीने कदम यांच्या गळ्यातील अंदाजे दोन तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गणपत कदम यांनी गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रतिक डांगे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११९(१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे.









