कनिष्ठ लिपिकालाही पोलिसांनी ठोकल्या बेड्या
रत्नागिरी:- कपात केलेली देयकाची रक्कम परत मिळवून देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या रत्नागिरी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंत्यासह एका कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे सरकारी महसूल आणि सिंचन विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार यांचा ‘शिवकृपा कन्स्ट्रक्शन’ नावाचा व्यवसाय आहे. त्यांना मंडणगड तालुक्यातील भोळवली येथील धरण गळती रोखण्यासाठी मातीकामाचे कार्यारंभ आदेश रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडून मिळाले होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर तक्रारदार यांची दोन देयके अदा करण्यात आली होती, मात्र तिसऱ्या आणि अंतिम देयकातून ११,३०,८९३/- रुपयांची रक्कम कपात करण्यात आली होती. ही कपात केलेली रक्कम परत मिळवण्यासाठी तक्रारदार यांनी कार्यकारी अभियंता गणेश हरीदास सलगर (वय ३६) यांची १८ मार्च २०२६ रोजी भेट घेतली. यावेळी ही रक्कम अदा करण्याच्या बदल्यात सलगर यांनी ३,४०,०००/-रुपयांच्या लाचेची मागणी केली.
लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रारदार यांनी २७ मार्च २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी येथे धाव घेऊन लेखी तक्रार नोंदवली. एसीबीने त्याच दिवशी पंचांसमक्ष पडताळणी केली असता, तडजोडीअंती २,००,०००/- रुपये स्वीकारण्याचे ठरले.
दरम्यान, मुख्य आरोपी गणेश सलगर यांनी लाचेची रक्कम कनिष्ठ लिपिक शेखर चंद्रमणी पवार (वय ३९) याच्याकडे देण्यास सांगितले. पवाराने ही रक्कम स्वतःच्या आणि सलगर यांच्या आर्थिक फायद्यासाठी स्वीकारताच, दबा धरून बसलेल्या एसीबी पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले.
यामध्ये गणेश हरीदास सलगर (वर्ग १): कार्यकारी अभियंता, रत्नागिरी पाटबंधारे विभाग आणि शेखर चंद्रमणी पवार (वर्ग ३): कनिष्ठ लिपिक टंकलेखक, रत्नागिरी पाटबंधारे विभाग या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून सध्या रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे आणि रत्नागिरी एसीबीचे उप अधीक्षक अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव व त्यांच्या पथकाने कारवाई केली.









