रत्नागिरी:- तालुक्यातील निरुळ, तेलीवाडी येथील एका ७० वर्षीय वृद्धाचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सुरेश पांडुरंग सकपाळ (वय ७०) असे मयत वृद्धाचे नाव असून, चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश सकपाळ हे निरुळ येथील आपल्या राहत्या घरी असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली पडले. या घटनेनंतर त्यांना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने औषधोपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात हलवले.
रविवारी, २२ मार्च रोजी संध्याकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने आय.सी.यू. विभागात हलवून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर त्याच रात्री ८:२६ वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी, २३ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी बी.एन.एस.एस कलम १९४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.









