चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास
रत्नागिरी:- शहरातील खेडशी नाका परिसरात असलेल्या ‘विजय ज्वेलर्स’ या सोन्या-चांदीच्या दुकानावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला आहे. शनिवारी (२१ मार्च) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असून, चोरट्यांनी दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश करत हजारो रुपयांचे दागिने आणि रोकड चोरून नेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेडशी नाका येथील केतन शशिकांत साळवी यांच्या मालकीच्या गाळा नंबर ३ मध्ये विजय रामचंद्र सागवेकर (वय ५६, रा. बोरभाटले) यांचे ‘विजय ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. २१ मार्च रोजी पहाटे २.३० ते ३.०० वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी संगनमताने दुकानाच्या बाहेरील शटर लोखंडी कटावणीने वाकवले. त्यानंतर आतील काचेच्या दरवाजाचे लॉक तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला.
चोरट्यांनी दुकानातील चांदीचे दागिने आणि रोख रकमेवर हात साफ केला. एकूण ५४ हजार ५०० रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे. याप्रकरणी फिर्यादी विजय सागवेकर यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (अ), ३३१ (४) आणि ३ (५) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ४५/२०२६ नुसार दाखल केला आहे. खेडशी नाका सारख्या वर्दळीच्या ठिकाणी पहाटेच्या वेळी ही घरफोडी झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत.









