काही तासांतच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
चिपळूण:- चिपळूण येथील खेड संसारेवाडा परिसरात राहत्या घराची खिडकी उघडून अज्ञात चोरट्याने सुमारे ३ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
फिर्यादी भूषण संदेश संसारे (३६, रा. खेड संसारेवाडा) हे आपल्या कुटुंबासह बाहेर गेले होते. १९ मार्च रोजी रात्री १०:०० ते २० मार्च रोजी मध्यरात्री १२:३० वाजेच्या सुमारास घर बंद असल्याचे पाहून चोरट्याने घराच्या खिडकीवाटे आत प्रवेश केला. घरातील रोख रक्कम आणि दागिने असा एकूण ३ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटा पसार झाला होता.
घटनेची माहिती मिळताच भूषण संसारे यांनी २० मार्च रोजी सकाळी १२ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांतच आरोपी सुहास जयंत कासार (२८, रा. खंड कागणेवाडी, ता. चिपळूण) याला शोधून काढले. दुपारी २ वाजता आरोपीला अटक करण्यात आली आहे.
चिपळूण पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ (क),
कलम ३३१ (४) कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, भरवस्तीत झालेल्या या घरफोडीचा तपास चिपळूण पोलीस अधिक सखोलपणे करत आहेत.









