Wednesday, May 13, 2026
spot_img
Home गुन्हेगारी रत्नागिरीत भरदिवसा दूध विक्रेत्याची ७० हजारांची रोकड लंपास

रत्नागिरीत भरदिवसा दूध विक्रेत्याची ७० हजारांची रोकड लंपास

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील कीर्तीनगर परिसरात भरदिवसा चोरीची एक खळबळजनक घटना घडली आहे. दूध वितरण करण्यासाठी गेलेल्या एका व्यवसायिकाच्या गाडीतून अज्ञात चोरट्याने ७० हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​फिर्यादी साईप्रसाद सदानंद मुस्कर (२८, रा. मांडवी मायनंकवाडी) हे गोकुळ दूध एजन्सीचे दूध वितरणाचे काम करतात. २० मार्च रोजी सकाळी ८ ते ९ च्या सुमारास ते आपली टाटा सुपर एस गाडी (क्र. MH-08/W/1152) घेऊन कीर्तीनगर येथील ‘साई सागर’ दुकानासमोर दूध देण्यासाठी थांबले होते.
​मुस्कर हे दुकानात दूध टाकत असताना, त्यांच्या वाहनाच्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला ठेवलेली काळ्या रंगाची हॅण्डबॅग अज्ञात चोरट्याने हातचलाखीने पळवून नेली.

​घटनेनंतर साईप्रसाद मुस्कर यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या वेळी ही चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत.