Sunday, May 10, 2026
spot_img
Home खेड भरधाव वाहनाने बाप-लेकीला चिरडले; चालकाचा जागीच मृत्यू

भरधाव वाहनाने बाप-लेकीला चिरडले; चालकाचा जागीच मृत्यू

मुलगी गंभीर जखमी

खेड:- खेड-दापोली महामार्गावरील फुरूस येथे गुरुवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास झालेल्या एका हृदयद्रावक अपघातात फुरूस बुलेश्वर वाडी येथील रहिवासी सचिन खामकर यांचा जागीच मृत्यू झाला.

सचिन खामकर हे आपल्या मुलीसह ॲक्टिव्हा दुचाकीवरून प्रवास करत असताना एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, खामकर यांच्या डोक्यावरून वाहनाचे चाक गेल्याने त्यांचा जागीच अंत झाला, तर त्यांच्यासोबत असलेली त्यांची कन्या या अपघातात गंभीर जखमी झाली आहे.

जखमी मुलीला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच फुरूस परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संताप व्यक्त करत खेड-दापोली महामार्ग रोखून धरला. संतप्त ग्रामस्थांनी सुमारे तीन ते चार तास रस्ता रोको केल्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि एका संशयित वाहनाला ताब्यात घेतले आहे. या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण फुरूस परिसरात शोककळा पसरली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.