दाभीळचे माजी सरपंच नंदकिशोर राणे यांचे निधन
खेड:- लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील डॉ. खान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या आता चारवर पोहोचली असून, या दुर्घटनेने संपूर्ण खेड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
६ मार्च रोजी घडलेल्या या स्फोटात गंभीर जखमी झालेले दाभीळ येथील रहिवासी आणि माजी सरपंच नंदकिशोर राणे (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मंगळवारी रात्री मृत्यू झाला. राणे हे मागील पाच वर्षांपासून गावाचे सरपंच म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुली असा परिवार असून, त्यांची पत्नी सध्या गर्भवती आहे. विशेष म्हणजे याच अपघातात त्यांचा सख्खा भाऊ रणजीत राणे हादेखील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नंदकिशोर राणे यांच्या निधनाची बातमी समजताच दाभीळ गावावर सुतकाची कळा पसरली असून औद्योगिक वसाहतीमधील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दुर्घटनेत आतापर्यंत लागोपाठ चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वप्रथम मुरुडे येथील रघुनाथ खामकर यांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर लातूरचे असद खान आणि मूळचे बंगालचे असलेले सुजन दास (वय २९) यांचाही उपचारादरम्यान अंत झाला. आता नंदकिशोर राणे यांच्या निधनामुळे मृतांचा आकडा वाढला आहे. ६ मार्च रोजी दुपारी रासायनिक प्रक्रिया सुरू असताना अचानक रिअॅक्टरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकूण अकरा कामगार गंभीररीत्या भाजले होते. त्यातील अधिक गंभीर असलेल्या सहा जणांना ऐरोली येथील नॅशनल बर्न हॉस्पिटल आणि मुंबईतील मसिना रुग्णालयात हलवण्यात आले होते. ७० टक्क्यांहून अधिक भाजलेल्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून, उर्वरित दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याने नातेवाइकांमध्ये चिंतेचे सावट आहे. एरव्ही छोट्या गोष्टींवरूनही आक्रमक पवित्रा घेणारे स्थानिक पुढारी मात्र या इतक्या मोठ्या प्राणहानीनंतरही शांत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.









