रत्नागिरी-कोल्हापूर चौपदरीकरण अंतिम टप्प्यात

येत्या काही महिन्यांत प्रकल्प पूर्ण होणार

रत्नागिरी:- पर्यावरणविषयक परवानग्या आणि जमीन संपादनाच्या कचाट्यात अडकलेल्या कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. येत्या ४ ते ६ महिन्यांत या महामार्गाचे काम पूर्ण करून हा प्रकल्प मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत दिली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या महामार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना गडकरींनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा मांडला.

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाचा पहिला टप्पा एक हजार ३२ रुपये खर्चाचा असून, ‘हायब्रीड ऍन्युइटी मॉडेल’ अंतर्गत याचे ८६ टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. जमीन संपादनाच्या प्रक्रियेमुळे काही ठिकाणी काम थांबले आहे. हे काम चार ते सहा महिन्यांत पूर्ण होईल, असा अंदाज आहे.दुसरा टप्पा ४२.२ किलोमीटर लांबीचा असून, या टप्प्याचे ७६ टक्के काम पूर्ण झाले आहे. तिसरा टप्पा ३२.९६ किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी २ हजार ५६ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. या टप्प्यातील ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती केंद्रीयमंत्री गडकरी यांनी दिली.

नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले की, प्रामुख्याने पर्यावरणविषयक परवानग्या आणि जमीन संपादनाशी संबंधित कायदेशीर प्रक्रियांमुळे काही ठिकाणी काम थांबले होते. मात्र, आता हे बहुतांश अडथळे दूर झाले आहेत. जमीन संपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पहिल्या टप्प्यातील उर्वरित काम पुढील सहा महिन्यांत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.