Friday, May 1, 2026
spot_img
Home चिपळूण चिपळूणमध्ये ‘नमन’ कार्यक्रमात राडा

चिपळूणमध्ये ‘नमन’ कार्यक्रमात राडा

बक्षिसाची पुकारणी न केल्याच्या कारणावरून मारहाण

चिपळूण:- तालुक्यातील कुटरे गुरववाडी येथे ‘नमन’ कार्यक्रमादरम्यान एका तरुणाने दिलेल्या बक्षिसाची पुकारणी न केल्याच्या कारणावरून मोठा वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एका ४० वर्षीय व्यक्तीला आरोपींनी बेदम मारहाण केली असून, यामध्ये फिर्यादीच्या नाकाचे हाड फॅक्चर झाले आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी रात्री अडीचच्या सुमारास कुटरे गुरववाडी येथील सहाणेजवळ नमनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी आरोपी आकाश चंद्रवदन जगदाळे याने नमन करणाऱ्या कलाकारांना बक्षीस म्हणून काही पैसे दिले. मात्र, कलाकारांनी त्या बक्षिसाची रीतसर घोषणा (पुकारणी) केली नाही. या छोट्याशा कारणावरून आकाशला राग आला आणि त्याने कलाकारांशी बाचाबाची सुरू केली.
​त्यावेळी उपस्थित असलेले फिर्यादी संतोष पांडुरंग चिनकटे (वय ४०, रा. कुटरे चिंचवाडी) आणि काही साक्षीदारांनी आकाशची समजूत काढली आणि त्याला बाजूला नेऊन शांत केले.

​वादानंतर थोड्या वेळाने आरोपी आकाश जगदाळे याने संतोष चिनकटे यांना आपल्या घरी नेले. ‘तू मला मघाशी लोकांसमोर का समजावून सांगितले?’ असा राग मनात धरून आकाश आणि त्याचे वडील चंद्रवदन सखाराम जगदाळे यांनी संतोष यांना थापटाने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आकाशने संतोष यांच्या नाकावर, तोंडावर आणि छातीत जोरात ठोसे मारले. या गंभीर मारहाणीत संतोष यांच्या डाव्या नाकपुडीचे हाड फॅक्चर झाले असून त्यांना मका मार लागला आहे.

​या प्रकरणी संतोष चिनकटे यांनी १० मार्च रोजी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी आकाश जगदाळे आणि चंद्रवदन जगदाळे यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११७(२), ११५(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.