मालकी मिळाल्याने रनपच्या एक कोटींची दरवर्षी होणार बचत
रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्याचा कणा असलेल्या ‘शिळ धरणा’बाबत राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या धरणाची मालकी आता अधिकृतपणे रत्नागिरी नगरपालिकेकडे हस्तांतरित होणार आहे. यामुळे नगरपालिकेचे दरवर्षी जलसंपदा विभागाला द्यावे लागणारे १ कोटी रुपये वाचणार आहेत.
शिळ धरणाच्या हस्तांतरणापूर्वी या धरणाची विशेष दुरुस्ती करून ते पूर्णपणे सुरक्षित केले जाणार आहे. शासनाने या कामासाठी १४ कोटी २६ लक्ष ८१३ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीतून खालील महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. यामध्ये धरणाच्या सांडव्याच्या वरच्या आणि खालच्या बाजूला पक्ष भिंतींची उभारणी. संरक्षक भिंतींची विशेष दुरुस्ती आणि पुनर्बाधणी. ही कामे पूर्ण झाल्यानंतर धरणाचे नियंत्रण आणि मालकी रत्नागिरी नगरपालिकेकडे सोपवण्यात येईल.
केवळ पाणीपट्टीचे पैसेच नाही, तर नगरपालिकेच्या वीज बिलातही मोठी बचत होणार आहे. या धरणावर सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार असून, त्या माध्यमातून पाणी उपसा करणाऱ्या पंपांना वीज पुरवली जाईल. यामुळे वीज बिलाचा मोठा आर्थिक भार कमी होऊन नगरपालिकेला मोठा दिलासा मिळणार आहे.
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आणि नगरपालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा विषय लावून धरला होता. या निर्णयाचे अनेक फायदे आहेत. धरण स्वतःच्या मालकीचे झाल्याने पाणी नियोजनाचे सर्व अधिकार नगरपालिकेकडे राहतील. दरवर्षी जलसंपदा विभागाला द्यावा लागणारा पाणीपट्टीचा खर्च शून्यावर येईल. सौर ऊर्जेच्या वापरामुळे वीज बिलात मोठी कपात होईल. वाचलेला हा सर्व निधी शहराच्या इतर विकासकामांसाठी आणि रस्ते, आरोग्य सुविधांसाठी वापरता येणे शक्य होणार आहे.









