Tuesday, May 5, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानास सुरुवात

रत्नागिरी तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानास सुरुवात

महसुली तक्रारींचे तात्काळ निराकरण; विविध मंडळांमध्ये शिबिरांचे आयोजन

रत्नागिरी:- नागरिकांच्या महसुली समस्यांचे जलद व प्रभावी निराकरण करण्यासाठी शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान – टप्पा क्र. १’ रत्नागिरी तालुक्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत विविध महसूल मंडळांमध्ये समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार असून नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित समस्या थेट अधिकाऱ्यांपुढे मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या अभियानाचे आयोजन उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने करण्यात आले आहे. अभियानाचा मुख्य उद्देश लोकाभिमुख प्रशासन, महसूल विषयक तक्रारींचे त्वरित निवारण आणि डिजिटल सेवांचा प्रसार हा आहे.
या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, विविध दाखले तात्काळ देणे, एक खिडकी योजनेअंतर्गत तक्रार निवारण तसेच अभिलेख ७/१२ दुरुस्ती संदर्भातील हेल्प डेस्क व मार्गदर्शन यांसारख्या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.पाली (०७ मार्च २०२६), खालगाव (११ मार्च २०२६), कोतवडे (१४ मार्च २०२६), तरवळ (१८ मार्च २०२६), जयगड (२५ मार्च २०२६), पावस (०१ एप्रिल २०२६), टेंबे (०८ एप्रिल २०२६), फणसोप (१० एप्रिल २०२६), मालगुंड (१७ एप्रिल २०२६), खेडशी (०५ मे २०२६) तसेच रत्नागिरी (०८ मे २०२६).

नागरिकांनी आपल्या संबंधित मंडळातील शिबिराच्या दिवशी आवश्यक मूळ कागदपत्रे व त्याच्या छायाप्रतीसह उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री. जीवन देसाई व तहसीलदार श्री. राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.