Wednesday, May 6, 2026
spot_img
Home रत्नागिरी पूर्णगडमध्ये एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन नौका ताब्यात

पूर्णगडमध्ये एलईडी मासेमारी करणाऱ्या दोन नौका ताब्यात

रत्नागिरी:- एलईडी प्रकाशाचा वापर करून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या दोन नौकांवर सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने कारवाई केली आहे. ही कारवाई रविवारी रात्री पूर्णगड समुद्र परिसरात करण्यात आली.

‘महिन’ नावाची मासेमारी नौका एलईडी दिवे लावून मासेमारी करत असल्याचे रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आले. गस्ती नौकेतून गस्त घालत असताना मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी लतिका गावडे व सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी रसिका सावंत यांच्या पथकाने ही कारवाई केली. ‘महिन’ ही नौका मोहसीन वस्ता यांच्या मालकीची असल्याची माहिती देण्यात आली आहे.

यापूर्वी दहा दिवसांपूर्वी मध्यरात्रीच्या सुमारास रत्नागिरी समुद्रात गस्तीदरम्यान ‘हर्षाली’ नावाची मासेमारी नौकाही एलईडी प्रकाश वापरताना आढळून आली होती. ही नौका प्रविण दळवी यांच्या मालकीची असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

दोन्ही कारवायांमध्ये एलईडी दिवे, जनरेटर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले असून संबंधित नौका मिरकरवाडा बंदरात अटकावून ठेवण्यात आल्या आहेत.