जमिनीच्या वादातून वृद्धावर प्राणघातक हल्ला

मंडणगडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

मंडणगड:- तालुक्यातील वलौते पाबलवाडी येथे जमिनीच्या वादातून ७२ वर्षीय वृद्धावर धारदार शस्त्राने आणि लोखंडी सळीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मनोहर शिवराम वराडकर (वय ७२, रा. वलौते पाबलवाडी) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचे नाव असून, त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.ही घटना २८ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

फिर्यादी मनोहर वराडकर हे आपल्या अंगणातील कुलदैवताच्या मंदिरातील लाईट लावून घरातील देवाच्या दिवाबत्तीसाठी जात असताना, संशयित आरोपी दीपक बाळकृष्ण वराडकर, ज्योती दीपक वराडकर, निखिल दीपक वराडकर आणि क्षितीज दीपक वराडकर यांनी त्यांच्या घरात विनापरवाना प्रवेश केला. ‘माझी जमीन फुकट घेतोस काय, थांब तुला मारूनच टाकतो’ असे म्हणत दीपक वराडकर यांनी धारदार शस्त्राने फिर्यादींच्या डोक्यात वार केले. त्याचवेळी निखिल वराडकर यांनी फिर्यादींना पकडून ठेवले, तर क्षितीज वराडकर यांनी लोखंडी सळीने त्यांच्या डाव्या हातावर आणि पाठीवर जोरात फटके मारून त्यांना गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता, चौघांनी फिर्यादींना घरातून बाहेर फरफटत ओढत आणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करत घटनास्थळावरून पळ काढला.या गंभीर प्रकारानंतर १ मार्च रोजी दुपारी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मंडणगड पोलिसांनी भारतीय दंड संहिता कायद्याच्या कलम १०९(१), ११८(२), ३३३, ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. जमिनीच्या जुन्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. या घटनेमुळे वलौते परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.