दुचाकी घसरून झालेल्या अपघातात वृध्दाचा मृत्यू

महामार्गावर संगमेश्वर करंजाळी येथील घटना

संगमेश्वर:- कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील करंजाळी (जिव्हाळा हॉटेलजवळ) येथे ७ फेब्रुवारी रोजी रात्री झालेल्या भीषण अपघातात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास आरोपी चालक श्रवणकुमार मांगीलाल परमार (वय २७, रा. पाली) हा आपल्या ताब्यातील ‘पॅशन प्रो’ मोटारसायकलवरून (क्रमांक MH 08 AT 8239) सदाशिव लक्ष्मण चव्हाण (वय ५५, रा. मठ-लांजा) यांना मागे बसवून देवळे ते पालीच्या दिशेने जात होता. या प्रवासादरम्यान महामार्गाची परिस्थिती लक्षात न घेता, चालकाने आपली गाडी हयगयीने आणि निष्काळजीपणे चालवून महामार्गावरील बंद असलेल्या लेनमध्ये नेली. तेथील मातीच्या ढिगाऱ्यावर गाडी जाऊन आदळली आणि स्लिप झाली. या भीषण अपघातात गाडीवरून पडल्याने सदाशिव चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. तर चालक श्रवणकुमार हादेखील जखमी झाला आहे.

अपघाताच्या या घटनेनंतर तब्बल २१ दिवसांनी, म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी पहाटे १ वाजता मयत सदाशिव चव्हाण यांचे चिरंजीव रितेश सदाशिव चव्हाण (वय ३१) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार, पोलिसांनी आरोपी चालक श्रवणकुमार परमार याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.