Thursday, September 17, 2026
spot_img
Home रत्नागिरी रनपच्या सर्वसाधारण सभेत अनेक प्रलंबित प्रश्न निकाली

रनपच्या सर्वसाधारण सभेत अनेक प्रलंबित प्रश्न निकाली

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेच्या गुरूवारच्या सर्वसाधारण सभेत रस्ता रुंदीकरण, मोकाट गुरे, भटके कुत्रे, भंगार विक्री, स्वच्छता, रासायनिक सांडपाणी प्रक्रिया, ट्रक टर्मिनल, रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या बाजार मक्त्यांबाबत साळवी स्टॉप येथील डंपिंग ग्राऊंड येथील कचऱ्याला लागणाऱ्या आगीवर उपाय शोधण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले. सभेसमोरचे सर्व विषय सर्वानुमते मंजूर झाले आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी ज्या जागा ताब्यात घ्यायच्या आहेत त्या जागा मालकांना इतर ठिकाणी त्यांच्या जागेचा टीडीआर स्वरुपात मोबदला देण्याचा निर्णय झाला आहे.

रत्नागिरी नगर परिषदेची सोमवारची सर्वसाधारण सभा संत गाडगेबाबा सभागृहात पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

पिठासीन अधिकाऱ्यांनी सभेच्या सुरूवातीलाच नगर परिषदेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी निर्णय घेवूया असे आवाहन केले. त्याचबरोबर इतरही समस्या सोडवायच्या आहेत असे सांगितल्यानंतर विषय पत्रिकेवरील विषयांना सुरूवात झाली.

रत्नागिरी शहराचे सर्व सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न होता समुद्रात जात आहे. यासंदर्भात सांडपाणी प्रक्रिया विषयावर चर्चा झाली. यावर उपाय म्हणून स्वतंत्र सांडपाणी पाईपलाईन व्यवस्था करण्यास सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. या सांडपाणी प्रक्रियेसाठी 14 नाल्यांचे पॉईंट निश्चित करण्यात आले असल्याचे प्रशासकीय अधिकारी मयुर बेहेरे यांनी सभागृहाला सांगितले. त्यामध्ये मत्स्योद्योगचे सांडपाण्याचीही प्रक्रिया केली पाहिजे, अशी सूचना नगरसेवक राजीव कीर यांनी केली. रासायनिक सांडपाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र जलवाहिनीची व्यवस्था लवकरात लवकर करावी, अशी सूचना नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी केली.

संपूर्ण शहरातील कचरा नियंत्रणासाठी प्रतिबंधक नामफलक आणि त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर सभापती निमेश नायर यांनी सूचना करताना हे बॅनर आणि कॅमेरे लावताना त्या त्या ठिकाणच्या नगरसेवकांची मदत घ्यावी. त्याचबरोबर कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारे दृश्य समाज माध्यमांवर प्रसारीत व्हावीत असेही सभापतींनी सूचित केले.

मोकाट गुरे पकडणे आणि त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यासाठी मक्तेदार निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोकाट गुरांना खाद्य घालणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक राजीव कीर यांनी केली. रत्नागिरी शहरातील बंद सिग्नल यंत्रणा सुरू करण्यावरही एकमत झाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या स्व निधीतून मांडवी समुद्र किनारी सोलर लाईट बसवण्याचा ठराव मंजूर झाला. हे सोलर लाईट सुरक्षित रहावेत, यासाठी त्याठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची आणि या सोलर लाईटची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी नगर परिषदेने घ्यावी अशी मागणी भाजप नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी केली. उत्पन्न वाढवण्यासाठी नगर परिषदेच्या मालकीची सर्व सभागृहे चालवण्यास दिली जावीत यासाठी गटनेते बाळू साळवी आणि ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांनी लक्ष वेधले. या सभागृहांचे भाडे खासगी हॉलप्रमाणे महागडे असू नये याकडे प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे असे नगरसेविका स्मितल पावसकर यांनी सूचित केले.

स्मशान भूमीतील अंत्यसंस्काराचे दर वाढवताना तेथे स्वच्छता असावी, चितेवर लाकडे रचून ठेवण्यासाठी नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नगरसेविका स्मितल पावसकर, नगरसेवक सौरभ मलुष्टे आणि राजीव कीर यांनी केली. भंगार विकण्यासाठी त्या भंगाराचे लेखा परिक्षण झाले आहे का असा सवाल नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी केले. रस्त्यात ठिकठिकाणी जुने विजेचे खांब काढून तेथेच टाकून ठेवण्यात आले आहेत ते महावितरणने उचलून न्यावेत यासाठी पत्रव्यवहार करावा, अशी सूचना सभापती निमेश नायर यांनी केली. रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्यांकडून फी वसूल करणाऱ्या मक्तेदाराने त्याच्या अखत्यारितील स्वच्छता केली पाहिजे. आठवडा बाजार संपल्यानंतर तेथील कचरा उचलण्यासाठी नगर परिषदेचे सफाई कामगार काम करतात. त्यामुळे शहरात इतर ठिकाणी स्वच्छतेच्या कामासाठी अडचणी येतात. मक्ता घेणाऱ्यांच्या करारात या स्वच्छतेचा मुद्दा असतो. परंतु मक्तेदारांकडून तो पूर्ण केला जात नाही. नगर परिषदेने सक्तीने त्या मक्तेदारांकडून सफाई करून घ्यावी अशी सूचना नगरसेवक प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी केली.

ट्रक टर्मिनलच्या ठिकाणी असलेले गाळे सुरू झालेलेे नाहीत. अशावेळी तेथे बाहेरून येणाऱ्या ट्रकचे पार्कींग आवश्यक सेवा-सुविधा नसल्याने होणार नाही. ही पार्कींग व्यवस्था पाहण्यासाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनाच काम द्यावे, जेणेकरून नगर परिषदेला उत्पन्न मिळेल, अशी सूचना नगरसेवक बंड्या साळवी आणि सौरभ मलुष्टे यांनी केली. ट्रक पार्कींगसाठी परिपूर्ण पार्कींग व्यवस्था नसल्याने साळवी स्टेॉप येथे ट्रक कोणत्याही इमारतीसमोर उभे केले जातात. त्यामुळे तेथील रहिवाशांची गैरसोय होते याकडेही नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी लक्ष वेधले.