शेनाळे-बर्गेवाडी येथील घटना; १.१२ लाखांचा मुद्देमाल लंपास
मंडणगड:- मालकीण आजारपणामुळे उपचारासाठी मुंबईला गेल्याची संधी साधून, त्यांच्याच गाडीवरील ड्रायव्हरने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने बंद कात कारखान्यातील सुमारे १ लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याची धक्कादायक घटना मंडणगड तालुक्यातील शेनाळे-बर्गेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी स्वाती विजय काते (वय ४७, रा. शेनाळे बर्गेवाडी) या कात कंपनीच्या मालकीण आहेत. जानेवारी महिन्यात स्वाती यांना टायफॉइड झाल्याने आणि त्यांच्या मुलीचीही प्रकृती खालावल्याने, त्या दोघी उपचारासाठी मुंबईला गेल्या होत्या. कारखाना बंद असल्याचे पाहून त्यांच्याच गाडीवर चालक म्हणून काम करणाऱ्या सोनाजी रमेश लोकरे (उर्फ गणेश) याने त्याचे दोन साथीदार अनिकेत राजेश मोरे आणि अक्षय जगन्नाथ कचरे (तिघेही रा. कराड, जि. सातारा) यांच्या मदतीने चोरीचा कट रचला. २४ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत आरोपींनी कारखान्याचे कुलूप तोडून आतील महागड्या वस्तू चोरून नेल्या.
चोरट्यांनी कारखान्यातून तांब्याची वायर, पेट्रोल मशिन, सायलेंट जनरेटर, ऑटो वॉल,ड्रिल मशिन, इलेक्ट्रिक मशिन, प्रेशर मीटर आणि ॲल्युमिनियम शीट या वस्तू लंपास केल्या आहेत.
फिर्यादी स्वाती काते यांनी २४ फेब्रुवारी रोजी मंडणगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०६ आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे. विश्वासू नोकरानेच अशा प्रकारे चोरी केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. मंडणगड पोलीस आरोपींच्या शोधासाठी कराड परिसरात पथक रवाना करण्याची शक्यता आहे.









