दापोली:- तालुक्यातील नानटे सजा येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०) यांना सातबारा उताऱ्यावर खरेदीखताची नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी युनिटने बुधवारी सायंकाळी रंगेहात अटक केली. ही कारवाई दापोली तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आली असून या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व त्यांच्या मित्रांनी मौजे तेरे वायंगणी येथील जमीन खरेदी केली होती. संबंधित खरेदीखताची सातबाऱ्यावर नोंद करून फेरफार मंजूर करण्याच्या प्रक्रियेसाठी ग्राम महसूल अधिकारी श्रद्धा बंडे यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. या मागणीबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागाने प्राथमिक पडताळणी करून तक्रार खरी असल्याची खात्री केली आणि सापळा कारवाईचे नियोजन केले. ठरल्याप्रमाणे आज सायंकाळी तक्रारदाराने दापोली तहसील कार्यालयातील सभागृहात श्रद्धा बंडे यांना ठरलेली रक्कम दिली. लाच स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने तत्काळ छापा टाकून त्यांना रंगेहात ताब्यात घेतले.
संशयित श्रद्धा बंडे या मागील वर्षीच शासकीय सेवेत दाखल झाल्या होत्या. तहसील कार्यालयासारख्या शासकीय ठिकाणीच लाच स्वीकारताना त्यांना अटक झाल्याने महसूल विभागात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र जाधव, पोलीस निरी सुहास रेंडे तसेच पथकातील अन्य कर्मचाऱ्यानी य शस्वीपणे पार पाडली.









