आधी मंजुरी आता पुढील सभेत स्थगिती, रनप सत्ताधाऱ्यांचा अजब कारभार

रत्नागिरी:- नगर पालिकेच्या पहिल्याच सर्व साधारण सभेमध्ये यापूर्वी पूर्ण झालेल्या कामांना मंजुरी देण्यात आल्यानंतर त्यावर आरोप होऊ लागल्याने, चार कामांना पुढील नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थगिती देण्याबाबत शिवसेनेच्या पार्टी मिटींगमध्ये निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात नगरसेवक अडचणीत येऊ नयेत यासाठी ही भूमिका घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.

रत्नागिरी नगर परिषदेच्या 30 जानेवारी रोजी झालेली पहिल्या सभेमध्ये पूर्ण झालेल्या कामांना नव्या पदाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्याचा प्रकार पुढे आला. याबाबत माजी नगराध्यक्ष मिलींद कीर यांनी आरोप करीत तक्रार केल्याने हा विषय अधिक चर्चेत आला. यामध्ये प्रभाग क्रमांक 14 मधील नगर परिषद शाळा क्रमांक 3 समोरील व्यायामशाळेच्या बांधकामाचे 30 लाखाचे अंदाजपत्रक मंजूरीसाठी मांडण्यात आले. मात्र हे काम आधीच पूर्ण झाले आहे. अरुण आईस्क्रीम शेजारील रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवणे, आठवडा बाजार येथील सार्वजनिक शौचालय परिसर सुशोभिकरण व अन्य कामांचा समावेश होता. याबाबत मिलींद कीर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही केली.
प्रशासकीय काळात पूर्ण झालेल्या कामांचे अंदाजपत्रक मंजूर केल्याचा ठराव झालेल्या विरोध झाल्यामुळे आता बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्य पूर्ण झालेल्या कामांना स्थगित करण्याचा ठराव मांडण्याचा निर्णय शिवसेनेच्या पार्टी मिटींगमध्ये घेण्यात आला. भविष्यात नगरसेवक अडचणीत येऊ नयेत याबाबत ही भुमिका घेण्यात आली. प्रशासनाच्या कालावधीत ही कामे झाल्यामुळे त्याची चौकशी समितीमार्फत करुन, त्यानंतर प्रशासनाने निर्णय घ्यावा अशीही चर्चा करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.