Sunday, June 28, 2026
spot_img
Home गुन्हेगारी दापोलीत दोन मंदिरात चोरी; लाखो रुपयांच्या पितळी घंटांसह कॅमेरा लंपास

दापोलीत दोन मंदिरात चोरी; लाखो रुपयांच्या पितळी घंटांसह कॅमेरा लंपास

दापोली:- दापोली तालुक्यातील कोळथरे जवळील चंडिकानगर, गोमराई येथील प्रसिद्ध चंडिकादेवी व कालिका देवी मंदिरात भरदिवसा चोरी झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने मंदिरातील अंदाजे ९६ हजार रुपये किमतीच्या तीन पितळी घंटा आणि सीसीटीव्ही कॅमेरा चोरून नेला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी बुधवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:४५ च्या दरम्यान घडली. चोरट्याने संधी साधून मंदिराच्या आवारात प्रवेश केला आणि स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने मौल्यवान वस्तू पळवल्या. याप्रकरणी फिर्यादी सुभाष भिकाजी घुबडे (वय ४६, रा. चंडिकानगर) यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला आहे.

​चोरट्याने मंदिरातील २०,१५,१० किलो वजनाच्या तीन मोठ्या पितळी घंटा, बि प्रो ८० कंपनीचा कॅमेरा लंपास केल्या आहेत. अशा प्रकारे एकूण ९६,००० रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.

​दापोली पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५ आणि ३३१(३) अन्वये गुन्हा रजिस्टर क्रमांक ०९/२०२६ नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा मंदिरासारख्या सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.