तस्करी प्रकरणातील फरार आरोपीस तब्बल ३४ वर्षानंतर अटक

तस्करीमध्ये पाकिस्तानी नागरिकांचा होता सहभाग; सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

रत्नागिरी:- मंडणगड तालुक्यातील वेळास बाणकोट खाडी येथे १९९१ मधील चांदीच्या विटांची तस्करी प्रकरणातील फरार आरोपीला ३५ वर्षानंतर अटक करण्यात आली. जॉन पॉलोज अब्राहम उर्फ जॉन दाढी (८३, रा. कुलाबा, मुंबई) असे संशयिताचे नाव आहे. जॉन/याने नुकताच रत्नागिरी सत्र न्यायालयापुढे जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी न्यायालयाने ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची मुक्तता केली.

तटरक्षक दलाने जुलै १९९१ साली वेळास बाणकोट खाडीत ‘अल अझहर’ नावाचे जहाज पकडले होते. या जहाजामध्ये २८६ चांदीच्या विटा व इतर प्रतिबंधित माल आढळून आला होता. सर्व प्रकार हा तस्करीचा असल्याचे निष्पन्न झाले होते. जहाजावर ५ पाकिस्तानी नागरिक देखील आढळून आले होते. जॉन हा या तस्करीमधला एक महत्वाचा आरोपी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले होते. जॉन हा जहाजावरील माल उतरविणे व त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यामध्ये सहभागी होता.

तटरक्षकडून अटक करण्यात आलेला आरोपी जॉन याला १९९२ साली न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. यानंतर खटल्यामध्ये शिक्षा होईल या भीतीने ती फरार झाला होता. या तस्करी प्रकरणातील उर्वरित आरोपींविरुद्ध दोषारोपत्र दाखल करुन खटला चालविण्यात आला होता. यातील आरोपी असलेल्या ५ पाकिस्तानी नागरिकांविरुद्ध खटला चालविण्यात आला होता. १५ जानेवारी १९९६ साली या पाकिस्तानी नागरिकांना न्यायालयाने दोषी ठरविले होते. दरम्यान जॉन याला न्यायालयाकडून वारंवार समन्स पाठविण्यात येत होते. मात्र तो गैरहजर राहिला असल्याने त्याच्याविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट काढण्यात आले होते.

जॉन याला अखेर पोलिसांकडून अटक करण्यात आली. तसेच त्याला रत्नागिरी न्यायादंडाधिकारी याच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. यावेळी जॉन याच्यावतीने रत्नागिरी सत्र न्यायालयापुढे जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

जॉन याच्यावतीने न्यायालयापुढे सांगण्यात आले की, जॉन याचे वय ८३ वर्षे असून कुलाबा मुंबई येथील रहिवासी आहे. तो फरार झाला नव्हता तर त्याला न्यायालयाचा समन्स मिळाला नव्हता. त्यामुळे प्रकरण प्रलंबित असल्याची त्याला माहिती नव्हती. जॉन याची जामिनावर मुक्तता केल्यास तो खटल्यामध्ये सहकार्य करेल. तसेच प्रत्येक तारखेला हजर राहिल. तसेच गुन्ह्याची शिक्षा ५ वषपिक्षा कमी असल्याने त्याला जामीन देण्यात यावा अशी विनंती करण्यात आली. त्यानुसार न्यायालयाने जॉन याची ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केली.