रत्नागिरी तालुक्यातील तीन गटात चुरशीची लढत

हातखंबा, पावस, कोतवडे जिल्हा परिषद गटात अटीतटीच्या लढती

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी ग्रामीण भागात सकाळच्या सत्रात मोठ्या उत्साहात मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर गर्दी केली होती. सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंत रत्नागिरी तालुक्यात 48.49 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली होती. तालुक्यातील पावस, हातखंबा आणि कोतवडे जिल्हा परिषद गटात चुरशीच्या लढती रंगण्याची शक्यता असून सोमवारी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकशाहीच्या या उत्सवात तरुणपिढीपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचाच सहभाग लक्षणीय ठरला. रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेचे 10 आणि पंचायत समितीच्या 20 जागांसाठी निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. शनिवारी सकाळी साडेसात वाजता प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली. ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर सकाळी नऊ वाजण्याच्या पूर्वीच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुपारचा उन्हाचा कडाका लक्षात घेऊन अनेक मतदारांनी सकाळच्या सत्रातच आपला मतदानाचा हक्क बजावण्याला पसंती दिली. यामध्ये महिला आणि नवमतदारांची संख्या लक्षणीय होती. करबुडे पाचकुडेवाडी, कपिल वास्तूनगर, मूळगाव करबुडे, पाली, साखरपा, भडखंबा आदी ठिकाणी ही परिस्थिती होती.

शनिवारी सकाळी पहिल्या दोन तासात रत्नागिरी तालुक्यामध्ये 12.27 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. मतदानाच्या सुरुवाती पासूनच महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या संख्येपेक्षा अधिक होती. पहिल्या दोन तासात तालुक्यात 25 हजार 100 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 15 हजार 271 पुरुष मतदार तर 9 हजार 828 स्त्री मतदारांनी मतदान केले. सकाळी 11.30 वाजेपर्यंत रत्नागिरी तालुक्यात 27. 08 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. यात 29 हजार 312 पुरुष मतदार तर 26 हजार 74 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 1.30 वाजेपर्यंत तालुक्यात 40.15 टक्के मतदान नोंदवले गेले. एकूण 82 हजार 112 जणांनी मतदान केले. यात 40 हजार 852 पुरुष तर 41 हजार 259 स्त्री मतदारांनी मतदान केले. सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंत 48.49 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. साडेतीन वाजेपर्यंत 99 हजार 163 जणांनी मतदान केले. यामध्ये 48 हजार 822 पुरुष मतदार तर 50 हजार 340 स्त्री मतदारांनी मतदान केल्याची नोंद करण्यात आली. साडेपाच वाजेपर्यंत मतदानासाठी देण्यात आलेल्या मुदतीमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 10 जिल्हा परिषद गट आणि 20 पंचायत समितीच्या गणांसाठी सरासरी 60 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली.

रत्नागिरीच्या ग्रामीण भागात मतदारांमध्ये असलेला उत्साह दिवसभर कायम होता. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक संवेदनशील आणि मुख्य केंद्रांवर दुपार पर्यंत वाजेपर्यंत 40 टक्के मतदान पूर्ण झाले होते. निवडणुकीसाठी उभारण्यात आलेल्या विविध मतदान केंद्रांवर उन्हाचा कोणताही परिणाम जाणवला नाही.

निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी भरारी पथके आणि वरिष्ठ अधिकारी स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मतदान केंद्रांच्या परिसरात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही मोठी लगबग पाहायला मिळाली; मात्र पोलिसांनी वेळीच सूचना देऊन गर्दीवर नियंत्रण मिळवले.