Friday, May 8, 2026
spot_img
Home चिपळूण लेकीच्या लग्नाचं स्वप्न अधुरे; चिपळुणातील फळविक्रेत्यांचं आकस्मिक निधन

लेकीच्या लग्नाचं स्वप्न अधुरे; चिपळुणातील फळविक्रेत्यांचं आकस्मिक निधन

चिपळूण:- लेकीचे लग्न ही कुठल्याही पित्यासाठी सर्वाधिक आनंदाची गोष्ट असते. चारच दिवसांपूर्वी लग्न ठरले आणि मे महिन्यात लग्नाचा दिवसही निश्चित झाला. आता लग्नाच्या तयारीची लगबग सुरू होत असतानाच पित्याने जगाचा निरोप घेतल्याची गहिवरून आणणारी घटना चिपळूणमध्ये घडली आहे. शहरातील प्रसिद्ध फळविक्रेते, चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती शाखा क्रमांक १ चे सभासद तसेच पाग बौद्ध कॉलनी येथील रहिवासी गौतम सीताराम जाधव (६०) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने आकस्मिक निधन झाले.

येत्या १० मे रोजी त्यांच्या दुसऱ्या मुलीचे लग्न ठरले होते. अवघ्या चार दिवसांपूर्वीच हे लग्न जुळले होते. घरात आनंद, तयारी आणि स्वप्नांची उधळण सुरू असतानाच वडिलांचे असे अचानक जाणे, ही घटना कुटुंबासाठी अत्यंत आघात करणारी ठरली आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर, हॉटेल आरंभशेजारी अनेक वर्षे फळविक्रीचा व्यवसाय करून गौतम जाधव यांनी प्रामाणिक कष्टाच्या जोरावर आपल्या तीनही मुलींचे शिक्षण पूर्ण केले. तिन्ही मुली पदवीधर असून, मोठ्या मुलीने फार्मसीची पदवी घेतली आहे. तिने नवी मुंबई येथे स्वतःचे मेडिकल सुरू करून स्वावलंबनाचे उदाहरण घालून दिले. दुसऱ्या मुलीच्या विवाहाची तारीख ठरली होती आणि घरात आनंदाचे वातावरण नांदत होते.

गौतम जाधव हे दिवंगत पत्रकार उत्तमकुमार जाधव, हर्षवर्धन गायन पार्टीचे गायक दिवंगत अनंत जाधव आणि चिपळूण नगर परिषद कर्मचारी प्रीतम जाधव यांचे बंधू होत. तसेच हॉटेल आरंभचे मालक हेमंत अनंत जाधव यांचे ते चुलते होत. त्यांच्या अचानक जाण्याने केवळ जाधव कुटुंबच नव्हे, तर परिसरातील व्यापारी, ग्राहक आणि परिचितांमध्येही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मनमिळाऊ स्वभाव, कष्टाळू वृत्ती आणि कुटुंबासाठी अखंड झटणारा पिता म्हणून गौतम जाधव यांची ओळख होती.

त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. आनंदाच्या उंबरठ्यावर उभे असलेले घर एका क्षणात शोकसागरात बुडाले असून, ‘मुलीचे लग्न पाहण्याचे स्वप्न अधुरेच राहिले,’ अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.