अंजणारी घाटातील घटना; चालक, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात तीव्र उतारावर ताबा सुटल्याने एक ट्रक उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असला, तरी अपघाताची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी ट्रकमधील सुमारे १५ लाख रुपये किमतीच्या पिठाच्या डाळीच्या बॅगा चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ट्रक चालक उग्रसेन रामधनी साकेत (वय ३१, रा. मध्यप्रदेश) हा ट्रक (क्रमांक: MP-09-HH-2388) घेऊन इंदूर येथून माल भरून गोव्याच्या दिशेने जात होता. २६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८:०० वाजण्याच्या सुमारास अंजणारी घाटातील तीव्र उतार आणि वळण पार करत असताना समोरून अचानक एक कार आली. कारला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रकवरील ताबा सुटला आणि चालक रॉग साईडला जाऊन ट्रक मातीवर आदळून पलटी झाला.
या अपघातात ट्रकचे आणि आतील मालाचे मोठे नुकसान झाले. ट्रक पलटी झाल्यावर त्यातील डाळीच्या बॅगा रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. चालक जखमी अवस्थेत असताना आणि परिसरात गोंधळ असताना, अज्ञात व्यक्तींनी संधी साधून रस्त्यावर पडलेला माल चोरून नेला. यामध्ये १४ लाख ९२ हजार ६४२ रुपये किमतीच्या पिठाच्या डाळीच्या बॅगांचा समावेश आहे.
फिर्यादी बळराम धर्मेंद्र डागर यांनी याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत खालील कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत. चालकाविरोधात अतिवेगात आणि बेदरकारपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) व मोटार वाहन कायदा १८४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. अपघातातील मालाचा अपहार केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१४ अन्वये अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला.









