अवैध मद्यविक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवर कारवाई

पोमेडी, गणपतीपुळेसह लांजात तिघांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी:- प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ठिकठिकाणी धाडी टाकून दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. रत्नागिरी ग्रामीण, जयगड सागरी आणि लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या कारवाया करण्यात आल्या.

​रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोमेडी रेल्वे ब्रीजजवळ, कारवांचीवाडी रस्त्यावर समीर विजय चाळके (३८, रा. पोमेडी) हा इसम विनापरवाना ‘किंगफिशर’ बियर पिताना रंगेहात सापडला. सपोफौ महेश टेमकर यांनी ही कारवाई केली असून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​जयगड सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुरव यांनी गणपतीपुळे-चाफे रस्त्यावर एका आंब्याच्या झाडाखाली कारवाई केली. तेथे सुरेश बाळू गोताड (४२, रा. चाफे) हा सार्वजनिक ठिकाणी ‘लंडन पिल्सन्नर’ बिअर पिताना आढळला. त्याच्यावरही दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

​लांजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुरचुंब फाटा येथे मोठी कारवाई करण्यात आली. महेंद्र शिवराम गुरव (३५, रा. कुरचुंब) हा इसम बस स्टॉपजवळील शेडच्या मागे बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असताना सापडला.

पोलीस कॉन्स्टेबल विकास पवार यांनी ही कारवाई केली असून आरोपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.