बंद सदनिका फोडून लाखोचा ऐवज लंपास

खेर्डीतील घटना; ७ तोळे सोन्यासह रोख रकमेवर चोरट्यांचा डल्ला

चिपळूण:- निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शहरालगतच्या खेर्डी परिसरात चोरट्यांनी आपले डोके वर काढले असून, एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून ७ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह मोठी रोख रक्कम लांबवल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, ऐन धामधुमीत झालेल्या या प्रकाराने पोलिसांच्या गस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

खेर्डी बाजारपेठेच्या जवळ असलेल्या एका इमारतीमध्ये मयूर खेतले यांचे कुटुंब वास्तव्यास आहे. गेल्या काही दिवसांपासून खेतले कुटुंबीय कामानिमित्त गावी गेले होते, त्यामुळे त्यांची सदनिका बंद होती. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. घरातील कपाटे फोडून त्यातील ६ ते ७ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. मंगळवारी ही चोरी झाल्याचे लक्षात येताच परिसरात एकच गर्दी झाली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक बंदोबस्त आणि तपासणी सुरू असताना, भरवस्तीत घरफोडी झाल्याने खेर्डीतील रहिवाशांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव चिंता व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.