चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई
चिपळूण:- गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार झालेला टीडब्ल्यूजे कंपनीचा संचालक संकेश घाग अखेर चिपळूण पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस संकेश घागच्या शोधात होते, अखेर त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून आज त्याला चिपळूण न्यायालयात हजर करण्यात आले. ही बातमी समजताच चिपळूण पोलीस ठाणे आणि न्यायालय परिसरात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केली होती.
टीडब्ल्यूजे कंपनीने राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांकडून जादा परताव्याचे आमिष दाखवून हजारो कोटींची गुंतवणूक करून घेतली होती, मात्र गेल्या काही महिन्यांपासून कंपनीचे संचालक आणि एमडी गायब झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. संकेश घाग पोलिसांच्या ताब्यात मिळाल्याने आता कंपनीचा मुख्य सूत्रधार आणि एमडी समीर नार्वेकर याचा शोध घेण्याचा मार्ग सुकर झाला असून गुंतवणूकदारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. यापूर्वी संतप्त गुंतवणूकदारांनी आपली हक्काची रक्कम परत मिळावी यासाठी अनेकदा मोर्चे आणि आंदोलनांचे इशारे दिले होते. आता न्यायालय संकेश घागला किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावते आणि पोलीस तपासात नेमकी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.









