रस्ते अपघातात जखमी वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

चिपळूण:- रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. धुमतियाल रतिलाल हरिजन (वय ६५, रा. फरी, ता. बरकोट नवगारा, जि. उत्तरकाशी, राज्य- उत्तराखंड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

​शनिवार, २४ जानेवारी रोजी पहाटे कराड-चिपळूण मार्गावरील पिंपळी बुद्रुक येथील ‘न्यू कोयना पॉवर हाऊस’ जवळ एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती. रस्त्याने जाणाऱ्यांना हा प्रकार दिसल्यानंतर तातडीने १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले.

​जखमी अवस्थेत असलेल्या धुमतियाल हरिजन यांना तत्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कामथे येथे दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक होती. रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

​या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस १९४ नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.