वेलदूरमध्ये दोन गटात हाणामारी; वृद्धासह महिला गंभीर जखमी

बांधकामाच्या वादातून मारहाण

गुहागर:- गुहागर तालुक्यातील वेलदूर गावात घरट गाडी परिसरात बांधकामाच्या वादाने अक्षरशः हिंसक स्फोट घेतला असून दोन गटांमध्ये झालेल्या अमानुष हाणामारीने संपूर्ण गाव हादरले आहे. वाद क्षणातच विकोपाला जाऊन लाठीकाठ्या व लोखंडी रॉड उगारले गेले. या थरारक हल्ल्यात वृद्धाचे डोके फोडण्यात आले असून महिलेला रॉडने पायावर वार करून गंभीर जखमी करण्यात आले आहे. भरदिवसा घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे वेलदूरमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

गणपत धाकू भुवड (वय 62, रा. घरट वाडीतर्फे वेलदूर) असे गंभीर जखमी वृद्धाचे नाव असून त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने तब्बल सात टाके पडले आहेत. त्यांच्या पत्नी शालिनी गणपत भुवड (वय 58) यांच्या पायावर लोखंडी रॉडने वार करण्यात आल्याने त्या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. या हल्ल्यात सात जणांनी सहभाग घेतल्याची माहिती समोर येत असून ही मारहाण पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटना सकाळी सुमारे 9.30 वाजता घडूनही बराच वेळ पोलिस घटनास्थळी न पोहोचल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे मुंबईवरून खास माणसे बोलावून ही मारहाण करण्यात आल्याची चर्चा परिसरात जोर धरत असून, यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. भुवड कुटुंबाच्या जागेबाबत 2025 पासून न्यायालयात प्रकरण सुरू असून याच वादातून यापूर्वीही त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. तरीही पुन्हा अशी जीवघेणी मारहाण होणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्ण अपयश असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, जुन्या बांधकाम वादातून दोन्ही गट समोरासमोर आले आणि शाब्दिक वादाचे रूपांतर थेट क्रूर हिंसाचारात झाले. काही क्षणांतच परिसर रणांगणात बदलला. वृद्धावर जीवघेणा हल्ला झाला, तर महिलेलाही निर्दयपणे मारहाण करण्यात आली. पती-पत्नीवर सध्या गुहागर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे वेलदूर गावात भीती, संताप आणि असुरक्षिततेची भावना पसरली असून “सामान्य नागरिक सुरक्षित आहेत का?” असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र वारंवार घडणाऱ्या हिंसक घटनांमुळे वेलदूर परिसरात तणाव कायम असून प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.