काकाकडून 2 वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला अटक

मंडणगड येथील प्रकार

मंडणगड:- मंडणगड तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर काकानेच  अत्याचार केल्याचे घटनेने तालुका हादरला आहे. याप्रकरणी मंडणगड पोलिसांनी नराधमाच्या अवघ्या १२ तासांच्या मुसक्या आवळून पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिकेची आई काही कामानिमित्त मंडणगड येथे आली असताना, तिच्या सख्ख्या चुलत दिराने खाऊ देण्याच्या बहाण्याने बालिकेला एसटी स्टँड परिसरातून दूर नेल्याचा आरोप आहे. काही वेळ लोटल्यानंतरही बालिका परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान, एसटी स्टँडजवळील एका पडिक खोलीत संशयास्पद प्रकार घडत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. नागरिकांनी हस्तक्षेप करताच आरोपीने घटनास्थळावरून पळ काढल्याचे समजते.

तत्काळ बालिकेला आईसह संबंधित पोलीस ठाण्यात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मंडणगड पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून १२ तासांच्या आत आरोपीला अटक केली. पोलिसांच्या या जलद व प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या प्रकरणामुळे नात्यातील व्यक्तीकडून झालेल्या अमानुष कृत्याने समाज हादरून गेला आहे. नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध स्तरांतून आरोपीवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.