देवरुख बागवाडी येथे घरफोडी ; ४ लाख ४० हजाराचा मुद्देमालाची चोरी

देवरुख:- देवरुख-बागवाडी (ता. संगमेश्वर) येथे घराचे मुख्य दरवाजा असलेले कुलूप उचकटून चोरट्याने धाडसी चोरी केली. घरात प्रवेश करुन घरातील कपाटातील ४ लाख ४० हजाराचे सोन्याचे दागिने पळविले. देवरुख पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता. १७) दुपारी साडेतीनच्या सुमारास देवरुख-बागवाडी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बागवाडी येथील फिर्यादी महिलेच्या घराचा मुख्य दरवाजा कुलूप कोणत्यातरी हत्याराने उचकटून चोरट्याने घरात प्रवेश केला. बेडरुमध्ये असलेल्या लोखंडी पत्र्याचे कपाटातील दरवाजाला असलेल्या चावीने कपाटाचा दरवाजा उघडून कपाटातील ड्राव्हर मधील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स त्यामध्ये एक मंगळसुत्र सोन्याचा सर व चेन असा ४ लाख ४० हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने पळविला. या प्रकरणी फिर्यादी महिलेने देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.