‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरीत ४८ गुन्हे दाखल, ७० आरोपी अटकेत

जिल्ह्यातील अमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला पूर्णपणे नशामुक्त करण्यासाठी आणि तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून वाचवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने ‘मिशन फिनिक्स’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली २५ मे २०२५ पासून ही मोहीम जिल्हाभरात प्रभावीपणे राबविली जात आहे.

या मोहिमेअंतर्गत अमली पदार्थांचे सेवन आणि वितरण रोखण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्याच्या विविध भागात धाडी टाकल्या आहेत. आतापर्यंत एकूण ४८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, यामध्ये अमली पदार्थ सेवनाच्या २४ आणि ते ताब्यात ठेवल्याच्या २४ केसेसचा समावेश आहे. या कारवाईत ७० आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ब्राऊन हेरोईन, चरस आणि गांजा यांसारखे विविध अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ३२,७३,९८९ रुपये इतकी आहे.

केवळ नवीन कारवायाच नव्हे, तर जुन्या गुन्ह्यांमधील जप्त केलेल्या मालाची विल्हेवाट लावण्याचे कामही पोलिसांनी चोख बजावले आहे. २६ डिसेंबर २०२५ रोजी, ड्रग्ज डिस्पोजल समितीचे अध्यक्ष नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत सन २०२० ते २०२५ या कालावधीतील ६५ गुन्ह्यांमधील १८१ किलो १४१ ग्रॅम मुद्देमाल (गांजा, चरस, ब्राऊन हेरोईन व एम.डी.) पुणे येथील रांजणगाव एमआयडीसीमध्ये सुरक्षितपणे जाळून नष्ट करण्यात आला.

केवळ पोलीस कारवाई करून नशा थांबवणे शक्य नाही, हे ओळखून पोलिसांनी लोकसहभागावर भर दिला आहे. कॉलेज विद्यार्थी आणि स्थानिक नाट्यगटांच्या मदतीने बस स्थानके, शाळा आणि चौक यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य सादर करून अमली पदार्थांच्या दुष्परिणामांची माहिती दिली जात आहे. याशिवाय, नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी सायकल रॅली, बाईक रॅली, मॅरेथॉन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृतीपर व्हिडिओ व रील्स प्रसारित केले जात आहेत.

“मिशन फिनिक्स” ही केवळ पोलिसांची मोहीम नसून ती एक सामाजिक चळवळ बनवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासन करत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांशी संबंधित कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा माहिती आढळल्यास नागरिकांनी थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.