चिपळूण:- तालुक्यातील सावर्डे परिसरातील एका कात उद्योगावर गुरुवारी पहाटे जीएसटी विभागाने मोठा छापा टाकला. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, अधिकाऱ्यांनी या मोहिमेबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.
काही दिवसांपूर्वीच सावर्डे येथील एका कात उद्योजकावर ईडीचा छापा पडला होता. सलग दोन दिवस ईडीचे पथक तेथे ठाण मांडून होते; मात्र या कारवाईनंतर त्याचे पुढे काय झाले, हे अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेले नाही. या कारवाईदरम्यान काही प्रमाणात बेकायदेशीर लाकूडसाठादेखील आढळून आला होता; मात्र त्याबाबत देखील नेमकी कोणती कारवाई करण्यात आली, हे अद्याप उघड झालेले नाही. सावर्डे पंचक्रोशीतील दहिवली खुर्द भागातील एक कात कारखाना सुरू आहे. गुरूवारी पहाटे जीएसटी अधिकारी पथकाच्या गाड्याचा ताफा दहीवलीत दाखल झाला. पहाटेच्या सुमारास आलेल्या पथकाने कारखान्याचा परिसर पूर्णतः ताब्यात घेतला. मुख्य प्रवेशद्वारावर सीआयएसएफचे जवान तैनात करण्यात आले. कारखान्याच्या आत कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही तसेच बाहेरूनही कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गुरूवारी सायंकाळी उशिरापर्यंत अधिकारी कारखान्यात तळ ठोकून होते.









