‘लाडकी बहीण’ योजनेत तांत्रिक चुकीचा महिलांना फटका

नोव्हेंबरचा हप्ता रखडला

रत्नागिरी:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक पात्र महिलांना केवळ एका तांत्रिक चुकीमुळे नोव्हेंबर २०२५ चा हप्ता मिळालेला नाही. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान ‘हो’ ऐवजी ‘नाही’ असा पर्याय निवडला गेल्याने हा गोंधळ निर्माण झाला आहे. या तांत्रिक त्रुटीमुळे हजारो गरजू महिला लाभापासून वंचित राहिल्या असून, मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालून दुरुस्तीची संधी द्यावी, अशी मागणी कर्ला येथील माजी सरपंच दीपक सुर्वे यांनी शासनाकडे केली आहे.

शासनाच्या निर्देशानुसार ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक होते. ही प्रक्रिया मोबाईल ॲप किंवा पोर्टलवर करताना ‘मल्टी फॅमिली व्हेरिफिकेशन’ अंतर्गत काही प्रश्न विचारले गेले होते. घाईगडबडीत किंवा तांत्रिक माहितीच्या अभावामुळे अनेक महिलांकडून जिथे ‘हो’ म्हणायचे होते तिथे ‘नाही’ आणि जिथे ‘नाही’ म्हणायचे होते तिथे ‘हो’ असा चुकीचा पर्याय निवडला गेला. या एका शब्दाच्या चुकीमुळे सिस्टिमने या महिलांना अपात्र ठरवले असून त्यांचे हप्ते थांबले आहेत.

हप्ता न मिळाल्याने पीडित महिला जेव्हा जिल्हा किंवा तालुका स्तरावरील महिला बालविकास कार्यालयात चौकशीसाठी जात आहेत, तेव्हा त्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचे समोर आले आहे. “ही तुमची चूक आहे, आम्ही काही करू शकत नाही, मंत्रालयात संपर्क साधा,” अशी उत्तरे प्रशासनाकडून दिली जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील गरीब महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे केवळ अशिक्षितच नव्हे, तर सुशिक्षित महिलांकडूनही अशा चुका झाल्याने या प्रक्रियेतील क्लिष्टता चव्हाट्यावर आली आहे.

दीपक सुर्वे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे. केवळ एका तांत्रिक चुकीमुळे हक्काच्या लाभापासून वंचित ठेवणे हा महिलांवर अन्याय असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.