Saturday, May 23, 2026
spot_img
Home रत्नागिरी आंबा कलमांवरील मोहरावर करपा, भुरी, अळीचा प्रादुर्भाव

आंबा कलमांवरील मोहरावर करपा, भुरी, अळीचा प्रादुर्भाव

आंबा बागायतदार चिंतेत, उत्पादनात घट होण्याची शक्यता

रत्नागिरी:- कोकणातील आंबा बागायतदारांसाठी सध्या चिंतेची स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम असून, याचा थेट परिणाम आंबा मोहरावर होण्याची भीती बागायतदार व्यक्त करत आहेत. या ढगाळ हवामानामुळे मोहरावर बुरशीजन्य रोग, करपा तसेच अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असून, त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे.

डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडल्यामुळे आंबा कलमांना चांगला आणि भरघोस मोहर आला होता. त्यामुळे यंदा आंबा हंगाम चांगला जाणार, अशी अपेक्षा बागायतदारांना होती. विशेषतः किनारपट्टी भागात पानांच्या तुलनेत मोहराचे प्रमाण अधिक असल्याने उत्पादन वाढीच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. काही ठिकाणी झाडे पूर्णपणे मोहरांनी भरलेली दिसून येत होती.

मात्र 1 जानेवारीपासून वातावरणात अचानक बदल झाला असून, ढगाळ हवामानामुळे बागायतदारांची चिंता वाढली आहे. दिवसभर सूर्यप्रकाश न मिळाल्याने झाडांवरील ओलसरपणा टिकून राहत आहे. यामुळे बुरशीजन्य रोगांना पोषक वातावरण तयार होत असून, मोहरावर करपा, भुरी तसेच अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय पहाटेच्या वेळी पडणाऱ्या दवामुळे रोगांचा फैलाव अधिक वेगाने होऊ शकतो, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. हवामानात लवकर सुधारणा होऊन सूर्यप्रकाश मिळावा, अशी अपेक्षा बागायतदार व्यक्त करत आहेत. पुढील काही दिवसांचे हवामान आंबा उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, त्यावरच यंदाच्या आंबा हंगामाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
कृषी विभागाच्या सल्ल्याने औषधे वापरावीत
ढगाळ हवामान दीर्घकाळ राहिल्यास मोहर गळण्याचे प्रमाण वाढू शकते. याचा थेट परिणाम फळधारणेवर होऊन उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. अनेक बागायतदारांनी आधीच प्रतिबंधात्मक फवारणी सुरू केली असून, हवामान लक्षात घेऊन योग्य सल्ल्यानुसार औषधांचा वापर करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.