खेड:- मंडणगड तालुक्यातील दुधरे येथे घराचे बांधकाम सुरू असताना अज्ञात चोरट्याने देव्हाऱ्यातून दोन मौल्यवान सोन्याच्या मूर्ती चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिलीप बाबुराव दळवी (६७, रा. दुधरे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुधरे येथील दिलीप दळवी यांचे जुने घर पाडून त्याच जागेवर नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाच्या सोयीसाठी त्यांनी घरातील देव्हारा चौथऱ्यावर मध्यभागी असलेल्या एका मोकळ्या जागेत ठेवला होता. ५ जानेवारी रोजी रात्री १०:३० ते ६ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास चोरट्याने संधी साधून हा ऐवज लंपास केला.
चोरट्याने देव्हाऱ्यातील तुळजाभवानी देवीची मूर्ती सुमारे ८.५ ग्रॅम वजनाची तर धारेश्वरी देवीची मूर्ती सुमारे ८.५ ग्रॅम वजनाची या दोन्ही सोन्याच्या मूर्तींची एकूण किंमत १ लाख ८४ हजार ९५५ रुपयांचा असा मुद्देमाल चोरला.
दळवी यांनी ६ जानेवारी रोजी दुपारी १२:२५ वाजता मंडणगड पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे. बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या लोकांची आणि परिसरातील संशयितांची चौकशी पोलीस करत आहेत.









