रत्नागिरी उपनगराध्यक्षपद भाजपकडे जाणार?

भाजपकडून तिघांची नावे चर्चेत; महत्त्वाच्या समित्यांवरही डोळा

रत्नागिरी:- शिवसेना-भाजप महायुतीने रत्नागिरी नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठा विजय मिळवत पालिकेवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. आता युतीच्या नेत्यांमध्ये उपनगराध्यक्षपदासह समित्यांच्या सभापतिपद वाटपाच्या वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या गटनेते पदाच्या निश्चितीचेही नियोजन केले जात आहे. भाजपला उपनगराध्यक्ष पदासह दोन समित्या मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी राजू तोडणकर, समीर तिवरेकर आणि सुप्रिया रसाळ यांची नावे चर्चेत आहेत.

रत्नागिरी पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 32 जागांपैकी 29 जागांवर महायुतीने विजय मिळाला. शिवसेनेला 23 आणि भाजपला 6 जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांचा योग्य समन्वय राहावा, यासाठी पालिकेतील गटनेते लवकरच जाहीर होणार आहेत. या पाठोपाठ उपनगराध्यक्ष आणि समित्यांचे सभापतिपद वाटप निश्चित होणार आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी पक्षाच्या पदाधिकार्‍यांना शिस्त पाळण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. पालिकेत नियोजन, शिक्षण, आरोग्य, पाणी पुरवठा, बांधकाम, महिला बालकल्याण आणि समाजकल्याण समित्यांसह स्थायी समिती सदस्य आहेत.
यातील एक समिती उपनगराध्यक्षाकडे जाणार आहे.

नगराध्यक्ष शिवसेनेचा असल्यामुळे आता उपनगराध्यक्षपद भाजपकडे जाणार आहे. त्यासाठी नगरसेवक राजू तोडणकर, समीर तिवरेकर आणि सुप्रिया रसाळ यांची नावे चर्चेत आहेत. याच बरोबर कोणत्या महत्त्वाच्या समित्या पदरात पाडून घ्यायच्या याबाबत भाजपची बैठक होणार आहे. भाजपच्या नेत्यांनी नवीन पदाधिकारी निश्चितीबाबत नियोजन केले आहे. शिवसेनेच्या सभापतिपदांसाठीही निर्णय होणार आहेत.