आंग्रेवाडी येथील घटना, दाभोळ पोलिसांत गुन्हा दाखल
दाभोळ:- दापोली तालुक्यातील सातेरे तर्फे हवेली येथील आंग्रेवाडी येथे जेवण बनवण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ३५ वर्षीय महिलेला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी सकाळी घडलेल्या या प्रकाराबाबत दाभोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत श्रीदेवी जनार्दन चोगले (वय ३५, रा. आंग्रेवाडी, सातेरे तर्फे हवेली, ता. दापोली) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी (दि. २३) सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली. फिर्यादी श्रीदेवी चोगले या आपल्या राहत्या घरात नाष्टा करत होत्या. त्यावेळी आरोपी सुवर्णा सुरेश चोगले यांनी कोणतेही कारण नसताना वाद घालण्यास सुरुवात केली. ‘तू वेगळे बनवून खातेस तर माझ्या घरात खायचे नाही, माझ्या घरातून निघून जा,’ असे म्हणत त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ केली. यावर फिर्यादीने ‘जे तुम्ही करता तेच मी करीत आहे,’ असे प्रत्युत्तर दिले.
याचा राग आल्याने आरोपी सुवर्णा चोगले यांनी त्यांच्या हातातील जेवण बनवण्याचे ॲल्युमिनियमचे भांडे फिर्यादीच्या उजव्या हातावर मारले. तसेच पडवीत असलेली लाकडी काठी घेऊन फिर्यादीच्या उजव्या पायाच्या पोटरीवर जोरदार प्रहार केला. या मारहाणीत श्रीदेवी चोगले यांच्या हाताला आणि पायाला दुखापत होऊन सूज आली आहे. याप्रकरणी दाभोळ पोलिसांनी सुवर्णा सुरेश चोगले यांच्यावर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.









