चिपळूण:- आजारपणाला कंटाळून एका प्रौढाने गवत मारण्याचे औषध प्राशन केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. या प्रकरणात संबंधित प्रौढावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
किसन दौलत सावर्डेकर (वय ६४, रा. बहाद्दूरशेख नाका) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबतची खबर सनी किसन सावर्डेकर यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किसन सावर्डेकर हे काही दिवसांपासून आजारी होते. आजारपणाला कंटाळून त्यांनी गवत मारण्याचे औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असता उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.









