रत्नागिरी:- तालुक्यातील कळझोंडी-गणेशवाडी येथे घरात कुणीही नाही या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने घरफोडी केली. या घरफोडीत चोरट्याने १ लाख १२ हजार रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिने व रोख रक्कमेवर डल्ला मारला. जयगड पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना मंगळवारी (ता. १६) सकाळी साडेदहा ते सायंकाळी चारच्या सुमारास कळझोंडी-गणेशवाडी येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रामचंद्र झराजी निंबरे (वय ४६, रा. कळझोंडी-गणेशवाडी, रत्नागिरी) हे मजूरीचा व्यवसाय करतात. कळझोंडी-गणेशवाडी येथे त्यांचे घर आहे. मंगळवारी ते सकाळी मजुरीसाठी कामाला गेले होते. घर बंद होते. या संधीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या घराच्या पाठच्या दरवाजाची आतून लावलेली कडी कोणत्यातरी हत्याराने उचकटून घरात प्रवेश केला. घरातील सोने-चांदीचे व रोख रक्कम पळविली. यामध्ये १८ हजाराचा एक ३ ग्रॅम वजनाची पुतळी, ४२ हजाराचे ७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी त्यावर साईबाबांचे चित्र, ४२ हजाराची ७ ग्रॅम वजनाची बदामाच्या आकाराची सोन्याची अंगठी, ९ हजार ३ ग्रॅम वजनाची चांदीचा लाल मण्यांचा सर, त्यामध्ये ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचा गोल मणी, १ हजार रोख रक्कम असा एकूण १ लाख १२ हजाराचा मुद्देमाल चोरट्याने पळविली. या प्रकरणी फिर्यादी रामचंद्र निंबरे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास जयगड पोलिस अमंलदार करत आहेत.









