खेड येथील घटना; लोखंडी पाईपसह काठीने मारहाण
खेड:- खेड तालुक्यातील मिर्ले धनगरवाडी येथे गुरे गोठ्याजवळ आल्याच्या किरकोळ कारणावरून एका ४० वर्षीय शेतकऱ्यावर तिघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या सुमारास फिर्यादी तुकाराम भागोजी माने यांच्या घरासमोर घडली. फिर्यादी यांची गुरे आरोपींच्या गोठ्याजवळ गेल्याचा राग मनात धरून आरोपी दिलीप भिकू माने याने सुरुवातीला फिर्यादीला शिवीगाळ करत ‘बघा आता तुमची कशी वाट लावतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास फिर्यादी तुकाराम माने आपल्या घरासमोर असताना आरोपी अनंत महिपत माने याने हातातील लोखंडी पाईपने त्यांच्या डोक्यात प्रहार केला. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून, त्याच वेळी आरोपी महिपत घाकटू माने याने बांबूच्या काठीने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या दंडावर मारहाण करून दुखापत केली.
हल्ला करताना आरोपींनी फिर्यादीला अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली आणि ‘आमच्या नादी लागू नको, नाहीतर तुला खल्लास करून टाकू’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीनंतर जखमी तुकाराम माने यांनी खेड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अनंत महिपत माने, महिपत घाकटू माने आणि दिलीप भिकू माने या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.
………..
सावर्डे येथे फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने महिलेची ३ लाखांची फसवणूक
विकासकांवर गुन्हा दाखल
चिपळूण: चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील कडप फाटा परिसरात फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, बिल्डरने फ्लॅटचा ताबा न देता रक्कमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाड-मुंबई येथील मूळ रहिवासी आणि सध्या डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटल परिसरात वास्तव्यास असलेल्या श्रीमती राजलक्ष्मी अय्यर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी सोजेन करिसिंगल एफ्राईम आणि दीपक सखाराम सावडेकर यांनी ‘फ्रेंड्स डेव्हलपर्स’च्या ‘फ्रेंड्स हाईट्स’ या प्रकल्पात फ्लॅट विकत देतो असे सांगून फिर्यादीकडून ९ लाख रुपये रोख स्वीकारले होते. हा व्यवहार ४ ऑक्टोबर २०२३ रोजी झाला होता. मात्र, प्रदीर्घ काळ उलटूनही आरोपींनी फिर्यादीला फ्लॅटचा ताबा दिला नाही.
फ्लॅट मिळत नसल्याने फिर्यादी यांनी आपली रक्कम परत करण्याची मागणी आरोपींकडे केली होती. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आरोपींनी ९ लाख रुपयांपैकी ६ लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित ३ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राजलक्ष्मी अय्यर यांनी पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून सावर्डे पोलिसांनी आरोपी सोजेन एफ्राईम आणि दीपक सावडेकर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींनी एकमेकांच्या संगनमताने हा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
……………
भावाने भावाच्या गुप्तांगाला केली दुखापत; डोक्यात दगड घालून जीवे मारण्याचा प्रयत्न
खेड: खेड तालुक्यातील खोपरेवाडी येथे दारूच्या नशेत असलेल्या धाकट्या भावाने आपल्या मोठ्या भावावर जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दारूच्या नशेत बडबड करू नको असे सांगणे मोठ्या भावाच्या जिवावर बेतले असून, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास खोपरेवाडी येथे घडली. फिर्यादी संदीप कोंडीराम खरावते (वय ४५) हे आपल्या घरी असताना त्यांचा भाऊ आरोपी सुरेश कोंडीराम खरावते हा दारूच्या नशेत मोठ्याने बडबड करत होता. संदीप यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला आणि दारूच्या नशेत बडबड करू नकोस असे सांगितले. याचा तीव्र राग मनात धरून सुरेश याने संदीप यांना सुरुवातीला हाताच्या थापटीने मारहाण केली. त्यानंतर रागाच्या भरात आरोपीने फिर्यादीचे गुप्तांग हाताने ओढून त्यांना गंभीर दुखापत केली आणि जमिनीवरील दगड उचलून त्यांच्या डोक्यात मारला.
या हिंसक हल्ल्यानंतर आरोपीने फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात संदीप खरावते हे जखमी झाले असून त्यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुरेश खरावते याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत असून कौटुंबिक वादातून झालेल्या या गंभीर प्रकारामुळे परिसरात चर्चा सुरू आहे.
………..
लाटवण फाटा येथे अज्ञात दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिला गंभीर जखमी; चालक फरार
मंडणगड: मंडणगड तालुक्यातील लाटवण फाटा येथे रस्ता ओलांडणाऱ्या एका ६० वर्षीय वृद्ध महिलेला अज्ञात दुचाकीस्वाराने जोराची धडक देऊन अपघात केल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली असून, अपघात घडल्यानंतर चालक घटनास्थळावरून दुचाकीसह पसार झाला आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता अनंत कदम (वय ६०, रा. लाटवण) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी, १६ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अनिता कदम या आपल्या मुलीसह बँकेतून पैसे काढण्यासाठी निघाल्या होत्या. लाटवण फाटा येथे रस्ता ओलांडत असताना एका भरधाव अज्ञात दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अनिता कदम रस्त्यावर कोसळल्या आणि त्यांच्या डोक्याला मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर संबंधित दुचाकीस्वाराने जखमी महिलेला मदत करण्याऐवजी तिथून पळ काढला.
जखमी अवस्थेत अनिता कदम यांना तातडीने मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) हलवण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरा मंडणगड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १३४ नुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सध्या या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने फरार दुचाकीस्वाराचा शोध घेत आहेत.









